जलतरणात महाराष्ट्राची पदक सप्तमी; आदितीला सुवर्ण   

गया : जलतरणात सलग दुसर्‍यांदा आदिती हेगडेने सुवर्णपदकाची लुट करीत ७व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्रासाठी पदकाचे खाते उघडले. आदितीच्या १ सुवर्णासह १ रौप्य व ४ कांस्य पदकांची कमाई करीत महाराष्ट्राने सोमवारी पदकाची सप्तमी साजरी केली.
 
गया शहरातील बीआयपीएआरडीच्या जलतरणात तलावावर अपेक्षेप्रमाणे महाराष्ट्राच्या जलतरणपटूंनी पदकांची लयलूट केली. आदिती हेगडेने १ सुवर्ण, १ कांस्य, समाईरा मल्होत्राने १ रौप्य, तर शुभम जोशी, झारा बक्षी, वेदांत तांदळे, ऋजुता राजाज्ञा यांनी कांस्य पदके जिंकून दिवस गाजविला.
 
मुलींच्या २०० मीटर फ्रीस्टाईल प्रकारात मुंबईच्या आदिती हेगडे २ मिनिटे ९.५१ सेंकद वेळेत शर्यत पूर्ण करून महाराष्ट्रासाठी स्पर्धेतील पहिले पदक जिकले. चुरशीच्या शर्यतीत शतांश सेकंदाच्या फरकाने दिल्लीच्या तितिक्षा रावतला मागे टाकून आदितीने बाजी मारली. तितिक्षाला २ मिनिटे ९.५८ सेंकद वेळेसह रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. याचबरोबर ८०० मीटर फ्रीस्टाईल प्रकारात आदितीला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. आदितीचे खेलो इंडिया स्पर्धेतील हे ६वे पदक ठरले. गत तामिळनाडू स्पर्धेत तीने पदकाचा चौकार झळकविला होता. मुंबईतील खेलो इंडिया अ‍ॅकॅडमीत ती सराव करत असते.
 
मुलींच्या १०० मीटर बेस्ट स्ट्रोक प्रकारात महाराष्ट्राचा डबल धमाका बघायला मिळाला. मुंबईच्या समाईरा मल्होत्रा व झारा बक्षी यांनी अनुक्रम रूपेरी व कांस्यपदकाला गवसणी घातली. कर्नाटकच्या मानवी वर्माने सुवर्णपदक जिंकले. मुलांच्या १०० मीटर बेस्ट स्ट्रोक प्रकारात ठाणेच्या शुभम जोशीने कांस्यपदकाची कमाई केली. कर्नाटकच्या क्रीश सुकुमारने सुवर्ण पदकाचा पल्ला पार केला.
 
मुलांच्या ५० मीटर बटरफ्लाय प्रकारात पुण्याच्या जलतरणपटूंनी महाराष्ट्रासाठी पदकांचा करिश्मा घडविला. मुलांच्या गटात पदार्पणातच वेदांत तांदळेने कांस्यपदकावर नाव कोरले. मुलींच्या गटात रूतुजा राजाज्ञाने सलग दुसर्‍या स्पर्धेत पदक जिंकण्याचा पराक्रम केला. गत स्पर्धेत तिने २ सुवर्णपदके जिंकली होती. वेदांत व ऋजुता हे दोघे पुण्यातील डेक्कन जिमखाना तलावावर सराव करीत आहेत.

Related Articles